Rajgurunagar | शांतता, सलोखा व भाईचारा ; राजगुरुनगरमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी

प्रभात वृत्तसेवा
राजगुरुनगर – इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) राजगुरुनगर येथे मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातून निघालेली मिरवणूक, लहान मुलांसाठी धार्मिक कार्यक्रम, शालेय वस्तू, मिठाई व सरबत वाटप असे उपक्रम आयोजित करून समाजातील शांतता, सलोखा व भाईचारा जपण्याचा संदेश दिला गेला.
या वर्षी गणेशोत्सव व पैगंबर जयंती एकाच वेळी आले असल्याने मुस्लिम समाजाने रविवारी (दि. 7) शांतता पूर्ण वातावरणात हा उत्सव साजरा केला. मिरवणूक दिलावर खान दर्गापासून निघून बाजारपेठ मार्गे मोमिन आळी येथे सांगता झाली. शहर व परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले, तर लहान चिमुकल्या मुलांचा उत्साह विशेष ठरला.
क्रांतिवीर राजगुरू चौकात जयंती निमित्त सरबत वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मिरवणुकीच्या समारोप प्रसंगी मौलाना आली अजगर अशरफी, मौलाना मुस्तकिम, मौलाना रजा आणि मौलाना मेहबूब यांच्या धार्मिक पठणातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमासाठी खेड पोलिस स्टेशनचे गोपनीय सुनील बांडे व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले.
मुस्लिम समाजाचे अध्यक्ष समीर मोमीन, सादिक मोमीन, नौशाद तांबोळी, फैज मोमिन तसेच मुस्लिम फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष रफिक मोमीन यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैद तांबोळी, साद मोमीन, अल्फेज मोमीन, तहलील मोमीन, फराज मोमीन, आया मोमीन, येरफ मोमीन आदी कार्यकर्त्यांनी मोठे सहकार्य केले. सूत्रसंचालन व स्वागत इम्रान मोमीन यांनी केले.
दहा वर्षांखालील मुलांसाठी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले गेले, ज्यात 145 मुले सहभागी झाली. मुलांच्या धार्मिक ज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शालेय वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. या उपक्रमातून समाजातील शांतता, श्रद्धा व एकात्मतेचा संदेश स्पष्टपणे प्रकट झाला.





