Rajgurunagar News : मतदार याद्यांवरून नवा वाद ; २६९० हरकतींमुळे राजकीय वातावरण तापले, बुधवारी होणार फैसला

प्रभात वृत्तसेवा
राजगुरुनगर – राजगुरुनगर नगरपरिषदेसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यांवर तब्बल 2690 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या असून, याबाबतची स्थळपाहणी नगरपरिषद प्रशासनाने पूर्ण केली आहे. या सर्व हरकतींवरील सुनावणी बुधवार, दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषद कार्यालयात प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.नगरपरिषद क्षेत्रासाठी एकूण 36 भागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
यापैकी 20 याद्या नगरपरिषद हद्दीतील, तर उर्वरित 16 याद्या नगरपरिषदेस लागून असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील मतदारांच्या आहेत. मुख्याधिकारी गर्कळ म्हणाले की, दि. 8 ऑक्टोबर रोजी नगरपरिषदच्या 10 प्रभागांतील 21 नगरसेवक पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या. 18 ऑक्टोबर ही त्यासाठीची अंतिम मुदत होती. या कालावधीत एकूण 2690 हरकती प्राप्त झाल्या असून, सर्व हरकतींचे वर्गीकरण व स्थळपाहणी पूर्ण करण्यात आली आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
हरकतींवर वादाची छाया..
हरकती दाखल करताना काही मतदारांनी एकाच व्यक्तीने विविध प्रभागांमध्ये हरकती दाखल केल्याचे समोर आले आहे. हे निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन असल्याचा आरोप माजी नगरसेवक मनोहर सांडभोर, मंगेश गुंडाळ, रेखा क्षोत्रिय, संदीप वाडेकर आदींनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्याधिकारी गर्कळ यांना निवेदन सादर केले आहे.
“सुनावणीसाठी संबंधित अर्जदार आणि मतदारांनी दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषद कार्यालयात उपस्थित राहावे, जेणेकरून त्यांच्या बाजूची मते प्राधिकृत अधिकार्यांसमोर मांडता येतील.”
-अंबादास गर्कळ, मुख्याधिकारी





