Rajgurunagar News | पोलीसांच्या डोळ्यासमोर मटका-जुगार ; राजगुरुनगरात कायद्याचा खेळ?

प्रभात वृत्तसेवा
राजगुरुनगर – राजगुरुनगर शहरातील जुन्या मोटार स्टँड आणि लगतच्या भाजी बाजारात खुलेआम लाल काळी (म्युझिक ट्राइगर) जुगार आणि मटका खेळला जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पोलीस मदत केंद्र आणि पोलिसांच्या उपस्थितीत हा अवैध धंदा बिनधास्तपणे सुरू आहे.जुगार-मटका खेळणाऱ्या व्यक्तींना खोटी आमिषे दाखवून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.
कार्यरत टोळी ग्राहकांना आकर्षित करून त्यांना जाळ्यात अडकवते. ग्राहकांचा खिसा रिकामा होईपर्यंत त्यांना जागा सोडू दिली जात नाही. त्यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडून आत्महत्येसारखे गंभीर प्रकार घडत आहेत. काही प्रकरणांमध्ये अड्डा चालवणारे आणि त्यांचे साथीदार ग्राहकांना मारहाणही करतात. खेड पोलिसांच्या आशीर्वादाने हा धंदा फोफावला असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
गुरुवारी (दि. २८) मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील राजगुरुनगरमार्गे मुंबईकडे जाणार होते. यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. बाह्यवळण आणि जुन्या महामार्गावर प्रत्येक १०० फुटांवर पोलीस तैनात असताना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ये-जा सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील गजबजलेल्या परिसरात लाल काळी ट्राइगर, मटका खेळला जात होता.
हजारो कार्यकर्ते आणि शेकडो वाहनांच्या येजा होती तरी या अवैध धंद्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध दारू, गावठी दारू, मावा, गुटखा आणि गांजासारख्या अमली पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. याविरोधात ग्रामपंचायती आणि नागरिक तक्रारी करतात, परंतु तक्रारदारांची माहिती पोलिसांकडूनच संबंधितांना पुरवली जाते, असा गंभीर आरोप आहे.





