Rajgurunagar News : जीवघेण्या खड्ड्यांमध्ये बसून नागरिकांचे चहापान आंदोलन !

राजगुरुनगर – वाडा – भीमाशंकर या राष्ट्रीय महामार्गावर सातकरस्थळ जवळील रस्त्यात पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमध्ये बसून नागरिकांचे चहापान आंदोलन झाले. नव्याने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या शिरूर राजगुरुनगर वाडा मार्गे भीमाशंकर रस्त्यावर सातकरस्थळ गावच्या जवळ मोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत.
भीमाशंकरकडे जाणाऱ्या भाविक भक्तांची पर्यटकांची वाहनाची संख्या मोठी आहे. या खड्ड्यात अनेक नागरिक पडून अपघात झाले आहेत. यात दुचाकीवरील महिलांचे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. स्थानिकांनी येथील खड्डे मुरूम टाकून बुजवले.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष याविरोधात अखेर सातकरस्थळचे काही ग्रामस्थ यांनी महामार्गावरील खड्ड्यात टेबल खुर्ची टाकून त्यावर बसून गांधी मार्गाने चहापान आंदोलन करण्यात आले.





