राजगुरूनगरमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद

राजगुरूनगर : कोरोना हद्दपार करण्यासाठी राजगुरूनगर येथे जनता कर्फ्युला नागरिकांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. शहरात सर्वत्र शांतता होती.महत्वाचे काम सोडून कोणीही रस्त्यावर न आल्याने अभूतपूर्व शांतता होती, तथापि रस्त्यावर कोणी नाही हे पाहण्यासाठी आलेल्यांना पोलिसांनी खाक्या दाखवला.
देशात राज्यात आणि विशेषतः पूणे जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ होत असताना नागरिकांनी सतर्कता बाळगताना घरी थांबणे पसंत केले आहे. काल राजगुरूनगर शहर 100 टक्के बंद होते तर आज शहरात जनता कर्फ्यु असल्याने दोन दिवस सर्वत्र शांतता आहे.
बाहेरून येणा-या व्यक्तीवर आरोग्य विभाग आणि नागरिक सुजाणपणे लक्ष ठेवून असून प्रत्येकाने शासनाने व आरोग्य विभागाने दिलेल्या पंचसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
एरवी गर्दीने फुललेल्या आणि वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या पुणे नाशिक महामार्गाने कित्येक दिवसांनी मोकळा श्वास घेतला आहे.
आज एसटी महामंडळाने जनता कर्फ्युला पाठिंबा दिल्याने एसटी वाहतूक बंद असल्याने एसटी स्टँड वर भीषण शांतता होती.
तालुक्यात एकूण 24 जणांनी परदेश वारी केली असून ते सर्व जण आरोग्य विभागाच्या निगराणी खाली असून आतापर्यंत सर्वजण निगेटिव्ह असल्याचे तालुका आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.





