चाकण वाहतूक कोंडी, अपघातांविरोधात राजगुरुनगर वकील बार असोसिएशनची उच्च न्यायालयात जनहित याचिका

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील चाकण परिसरातील पुणे-नाशिक आणि शिक्रापूर-तळेगाव राष्ट्रीय महामार्गावरील सततची वाहतूक कोंडी आणि जीवघेण्या अपघातांविरोधात राजगुरुनगर वकील बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. वैभव कर्वे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे नागरिक हैराण
पुणे-नाशिक आणि शिक्रापूर-तळेगाव राष्ट्रीय महामार्गांवर चाकण परिसरात दररोज होणारी वाहतूक कोंडी आणि वारंवार घडणारे जीवघेणे अपघात यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. विशेषत: शिक्रापूर-तळेगाव मार्गावरील अरुंद रस्ता अपघातांचे प्रमुख कारण बनला असून, येथे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. या गंभीर समस्येकडे केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
जनहित याचिकेचा ठराव आणि पुढील पावले
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राजगुरुनगर वकील बार असोसिएशनने गुरुवार, दि. ३ जुलै रोजी बैठक घेऊन मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ठराव मंजूर केला. पत्रकार परिषदेत ॲड. वैभव कर्वे यांनी वाहतूक कोंडी आणि अपघातांबाबत चिंता व्यक्त करत याचिका दाखल करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. शंकर कोबल, सचिव ॲड. नवनाथ कड, माजी अध्यक्ष ॲड. अनिल राक्षे, ज्येष्ठ वकील ॲड. सी. एस. सांडभोर, ॲड. मनिषा पवळे, ॲड. विक्रम कड, ॲड. सुभाष करंडे, ॲड. मनोहर जंबुकर, ॲड. अरुण मुळूक, ॲड. आरती सैद, ॲड. रुकसाना पठाण, ॲड. प्रवीण बोंबले, ॲड. दीपक थिगळे, ॲड. करण कांबळे आणि ॲड. मीनानाथ साबळे उपस्थित होते.





