Pune District : राजगुरुनगर वकील संघटना आक्रमक; टोरेंट विद्युत प्रकल्प रद्द करण्याची मागणी
Pune District : विकासकामे करताना पर्यावरण संरक्षण, वनसंपदेचे संवर्धन आणि जैवविविधतेचे जतन यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

राजगुरूनगर : भीमाशंकर अभयारण्यातील टोरेंट विद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेली वृक्षतोड तातडीने थांबवून प्रस्तावित प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी राजगुरुनगर वकील संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकार्यांसह वकिलांनी खेडच्या तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
भीमाशंकर अभयारण्य हे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असून, येथील समृद्ध वनसंपदा आणि जैवविविधतेला विशेष महत्त्व आहे. वृक्षसंपदा वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण, पर्यावरणाचा समतोल आणि नैसर्गिक परिसंस्थेच्या संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. अशा संवेदनशील परिसरात विद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणावर दूरगामी परिणाम होण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे.
विकासकामे करताना पर्यावरण संरक्षण, वनसंपदेचे संवर्धन आणि जैवविविधतेचे जतन यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. भीमाशंकरसारख्या महत्त्वाच्या अभयारण्यातील वृक्षतोडीमुळे नैसर्गिक पर्यावरणाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने संबंधित काम तातडीने थांबवावे आणि प्रस्तावित टोरेंट विद्युत प्रकल्प रद्द करण्याबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. वनसंपदा ही भावी पिढ्यांसाठी जपून ठेवण्याची नैसर्गिक संपत्ती असल्याचेही संघटनेने नमूद केले.
हे निवेदन तहसीलदारांच्या वतीने मंडल अधिकारी सविता घुमटकर यांनी स्वीकारले. यावेळी राजगुरुनगर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. अतुल उर्फ प्रदीप गोरडे, माजी अध्यक्ष डअॅ. बाळासाहेब लिंभोरे, अॅड. अनिल राक्षे, अॅड. अरुण मुळुक, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. पोपटराव तांबे-पाटील, अॅड. माणिक पाटोळे, अॅड. मुकुंदराव आवटे, अॅड. चंद्रकांत सांडभोर, अॅड. कृष्णा भोगाडे, अॅड. अजय पडवळ, अॅड. अविनाश बोर्हाडे, अॅड. गणेश गाडे, अॅड. सुदीप परदेशी, अॅड. अमोल तळेकर, अॅड. महेश चौधरी, अॅड. सुरेखा कड, अॅड. शुभांगी निघोट आणि अॅड. रेश्मा बिरदवडे यांच्यासह संघटनेचे अनेक वकील उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. बाळासाहेब लिंभोरे, अॅड. अनिल राक्षे आणि ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. पोपटराव तांबे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
भीमाशंकर अभयारण्यातील वृक्षतोड थांबविणे आणि प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याबाबत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. निवेदनानंतर संबंधित यंत्रणा आणि शासन काय भूमिका घेतात, तसेच पर्यावरण संरक्षणासाठी कोणती कार्यवाही करतात, याकडे नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.
भीमाशंकर अभयारण्य पर्यावरणीय आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. येथील वृक्षतोडीमुळे नैसर्गिक समतोल आणि वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विकासाच्या नावाखाली मौल्यवान वनसंपदेचा र्हास होऊ नये. त्यामुळे टोरेंट विद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेली वृक्षतोड तातडीने थांबवून प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा. पर्यावरणाचे संरक्षण आणि भावी पिढ्यांचे हित जपण्यासाठी राजगुरुनगर वकील संघटना या विषयावर ठाम भूमिका मांडत राहील.
-अॅड. अतुल गोरडे, अध्यक्ष, राजगुरुनगर वकील संघटना





