Rajgurunagar Council Budget 2026 – राजगुरुनगर नगरपरिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा नगरपरिषद इतिहासातील अकरावा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. शिलकीचा अर्थसंकल्प असल्याची माहिती राजगुरूनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली. राजगुरुनगर नगरपरिषदमध्ये सात वर्षे प्रशासक राज होते. यावर्षी निवडणूक झाल्यानंतर नवीन अध्यक्ष व नगरसेवक यांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प जाहीर होणार होता. त्याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले होते. नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागामार्फत सादर करण्यात आला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात मर्यादित उत्पन्न व खर्च साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नको असलेल्या खर्चाला काटछाट देण्यात आली आहे. आरंभीची शिल्लक 26 कोटी रुपये, एकूण जमा रक्कम 122 कोटी 80 लाख रुपये आणि एकूण खर्च 109 कोटी 40 लाख रुपये असून 26 लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे. केवळ व्यवसाय परवाना शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. विकासाच्या दृष्टीने व जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता मार्गदर्शक तत्वानुसार प्रशासनाने हे अंदाजपत्रक बनविले आहे. नगरपरिषदेचे आर्थिक बाजू सक्षम राहण्यासाठी नवीन आर्थिक वर्षात करवसुलीला प्राधान्य देण्यात आले आहे. पाणी योजना, शहरातील भुयारी गटार योजना, शहर सुशोभीकरण व शहरातील अनेक भागामध्ये रस्ते मजबुतीकरण याला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. यावेळीच्या अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण, दुर्बल घटकातील नागरीक तसेच दिव्यांग नागरिक यांकरिता प्रत्येकी 5 टक्के तरतूद करण्यात आलेली आहे. पार्किंग, सार्वजनिक शौचालये, मुतार्या, आठवडे बाजार आणि जेष्ठ नागरिक यांच्यासाठी अर्थसंकलपात विशेष तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी -पाणी पुरवठा व विस्तारीकरण – 1 कोटी 50 लाख रुपये. -भूमिगत गटारे योजना टप्पा क्र. 2 – 35 कोटी रुपये -नमामि चंद्रभागा अभियानातंर्गत भीमानदी स्वच्छता संर्वधन – 5 कोटी रुपये -अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवणे – 10 कोटी रुपये. -रस्ते बांधकाम – 5 कोटी रुपये -दिवे आणि विद्यूत खांब – 50 लाख रुपये -पाणी पट्टी व वीज बिल – 1 कोटी 50 लाख रुपये उत्पन्नाच्या प्रमुख बाबी -करापासूनचे उत्पन्न – 7 कोटी 28 लाख रुपये. -पाणी पट्टी- 2 कोटी 50 लाख -बांधकाम विकास शुल्क – 2 कोटी 50 लाख रुपये. -नगर परिषद साहाय्य अनुदान – 2 कोटी 50 लाख रुपये. “यावर्षीचा शिलकीचा अर्थसंकल्प आहे. खर्चात कपात केली आहे. कोणतीही करवाढ केली नाही. मात्र व्यवसाय परवाना शुल्कात वाढ करण्यात आली आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत.” – अंबादास गर्कळ, मुख्याधिकारी राजगुरुनगर नगरपरिषद “यावर्षीचा रिऍलिस्टिक असा अर्थसंकल्प आहे. मर्यादित उत्पन्न व खर्च साधण्याचा प्रयत्न केला आहे. नको असलेले उत्पन्न व खर्चाला काटछाट देण्यात आली आहे. उत्पन्न व खर्चावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत.” – बालाजी माने, लेखा अधिकारी, राजगुरुनगर नगरपरिषद