राजगड तालुका नामकरणाचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत; मावळ्यांचा जल्लोष

पुणे – छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांची कर्मभूमी असलेल्या वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका करण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत आज गुरुवारी (२१) वेल्हे बुद्रुक ( ता. राजगड) येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक रिवाजात स्वागत करण्यात आले. हर हर महादेव, जय शिवरायच्या जयघोषाने, हलगी,तुरारीच्या निनादाने राजगड तोरण्याची दरी खोरी दुमदुमून गेली होती. परिसरातील शेकडो मावळ्यां रहिवाशांसह विविध राजकीय पक्षांचे, संघटनेचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या पुर्वी राज्य मंत्रिमंडळाने वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका असे करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर केंद्र सरकारच्या मान्यतेची प्रतिक्षा लागली होती अखेर काल (२०) केंद्र सरकारने राजगड तालुका नामकरणास मंजुरी दिली. त्यामुळे देशासह जगाच्या नकाशावर राजगड तालुका विराजमान होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वाधिक काळ २६ वर्षं वास्तव्य असलेल्या व हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याचे नाव वेल्हे तालुक्यास देण्यात यावे यासाठी गेल्या दहा वर्षांपासून मावळा जवान संघटनेचा पाठपुरावा सुरू होता. आज राजगड तोरणा सह पानशेत सिंहगड भागात सर्वपक्षीय नेत्यांसह शिवप्रेमी संघटनां, मावळ्यांनी या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले.
ठिक ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात,फटाक्यांच्या आतषबाजीत, साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वेल्हे बुद्रुक पंचायत समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुणे जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना करण्यात आले.
यावेळी मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे, राजगड पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी एस.टी.तेलंग, वेल्हे पोलिस ठाण्याचे अंमलदार आकाश पाटील, भाजपचे राज्य परिषदेचे सदस्य बाळासाहेब गरुड, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, जीवन कोंडे, तालुकाध्यक्ष राजू रेणुसे, आनंद देशमाने, सुनील जागडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर, बाळासाहेब सणस , इंद्रजीत जेधे , लक्ष्मण भोसले, खंडु गायकवाड रामभाऊ राजीवडे, आदी उपस्थित होते.
जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या जगातील पहिल्या हिंदवी स्वराज्य या स्वतंत्र लोकशाहीवादी राष्ट्रातील राजगड हा पहिला तालुका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका करून छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या विश्ववंदनीय कार्याच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात प्रखर राष्ट्रीय बाण्याचा जागर होणार आहे.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या काळापासून राजगड तालुक्याचा उल्लेख आहे. शिवरायांनी किल्ले राजगडावरून १६४८ ते १६७२ पर्यंत पंचवीस वर्षे राज्यकारभार पाहिला. राजगड जगातील स्वंतत्र राष्ट्राची पहिली राजधानी आहे. राजगडाला ज्वलंत राष्ट्रीय वारसा आहे.
राजगड तालुका नामकरणाने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या लोककल्याणकारी कार्याचा जगभरात जागर होणार आहे अशी भावना यावेळी मावळ्या रहिवाशांनी व्यक्त केल्या.
पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे व महसूलमंत्री यांचे मनपूर्वक आभार. तालुक्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय आहे. यातून राजगड तालुका हा जगाच्या नकाशावर येणार आहे. – शंकर मांडेकर, आमदार भोर राजगड मुळशी





