Pune Crime: पुणे पोलिसांना जमलं नाही ते राजगड पोलिसांनी केलं; गुटखा तस्कराला पावणे दोन वर्षांनी बेड्या

पुणे: राजगड पोलिसांनी एका चतुर गुटखा तस्कराला अखेर जेरबंद केलं. पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याच्या पोत्यासह ट्रकची थेट चौकीसमोरून चोरी करून पावणेदोन वर्षांपासून फरार असलेल्या निजामुद्दीन महेबुब शेख (वय ४०, रा. लोहियानगर, गंजपेठ, सध्या मयूरपंख सोसायटी, कोंढवा) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याच्याकडे दोन नावांचं एकच आधारकार्ड सापडलं. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
२८ मे २०२३ रोजी राजगड पोलिसांनी विमल गुटख्याच्या तस्करीचं मोठं रॅकेट उध्वस्त केलं होतं. यात दोघांना अटक करून ४१ लाख १३ हजारांचा गुटखा आणि १० लाखांचा ट्रक, असा एकूण ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. हा ट्रक खेड शिवापूर पोलीस चौकीसमोर श्रीरामनगर (ता. हवेली) येथे उभा होता. पण पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गुटख्यासह ट्रक पळवला. चार किलोमीटर अंतरावर गुटख्याची पोती चोरून ट्रक सोडून दिला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. स्थानिक गुन्हे शाखेने एका गोदामात छापा टाकून कोट्यवधींचा गुटखा जप्त केला, तेव्हा त्या आरोपीने निजामुद्दीन शेखचं नाव उघड केलं.
पोलिसांचा तपास आणि अटक-
निजामुद्दीन शेख हा येरवडा, खडक, काळेपडळ पोलीस ठाण्यांतही वॉन्टेड होता. पण पुणे पोलिसांना तो हाती लागत नव्हता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. अखेर २८ मार्च रोजी राजगड पोलिसांनी त्याला कोंढव्यातून अटक केली. पोलीस निरीक्षक राजेश गवळी म्हणाले, “आम्ही त्याच्या साथीदारांचाही शोध घेत आहोत. त्याच्यावर पुण्यातील अनेक ठाण्यांत गुटखा तस्करीचे गुन्हे आहेत.”
दोन नावांचं आधारकार्ड आणि बँक व्यवहार-
चौकशीत शेखच्या मोबाइलमध्ये दोन नावांचं एकच आधारकार्ड सापडलं. तसेच, १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या काळात त्याच्या HDFC बँक खात्यात कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचं उघड झालं. पोलीस अधिकारी अजित पाटील म्हणाले, “या व्यवहारांची तपासणी सुरू आहे. त्याच्या गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश होईल.”





