Rajesh Pande BJP : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत मोलाचे योगदान देणारे व पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबद्दल अधिकृत घोषणा केली. राजेश पांडे यांना चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असतांना लोकसभा निवडणुकी दरम्यान सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आता भाजपचे नवे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सरचिटणीस टीममध्येही राजेश पांडे यांची वर्णी लागली आहे. राजेश पांडे यांच्यासह निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाई आणि सुनील राणे हे सरचिटणीस म्हणून रवींद्र चव्हाण यांच्यासोबत काम करतील. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस असलेले राजेश पांडे ४० वर्षांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून अभ्यासू, मितभाषी, उत्तम संघटक आणि नावीन्यपूर्ण लोकसहभाग उपक्रम राबविणारे अशी पांडे यांची ओळख आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या मुशीत वाढलेला, विद्यार्थी चळवळीत तयार झालेला कुशल संघटक आणि निष्ठावान चेहऱ्याला पक्षाने संधी दिली अशी भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. मी गेली ४० वर्ष सामाजिक जीवनात सक्रिय आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून पक्षाने पुन्हा एकदा सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.आगामी काळात देखील पक्षाचा विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटना अधिक भक्कम करण्यासाठी नव्या ऊर्जेने आणि निष्ठेने काम करत राहील. – राजेश पांडे, सरचिटणीस, भाजपा