Maharashtra Politics : शरद पवारांचा अजित पवारांना आणखी एक धक्का ! ‘हा’ नेता करणार घरवापसी

बुलढाणा : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील एका महिन्यांपासून राजकीय संभ्रम कायम ठेवून वरकरणी तळ्यात-मळ्यात अशी भूमिका दर्शविणारे सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे आज तुतारी हाती घेऊन घरवापसी करणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात राजेंद्र शिंगणे यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे.
तब्बल पाचवेळा सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदारपद भूषवणारे शिंगणे यांनी मागील महिनाभरापासून मतदारसंघातील राजकीय संभ्रम कायम ठेवला. तांत्रिकदृष्ट्या ते अजित पवार यांच्यासोबत होते, मात्र मनाने शरद पवारांसोबत! त्यामुळे ते महायुती कडून लढणार कि महाविकास आघाडीकडून हा प्रश्न लोकांच्या मनात होता. अखेर त्यांनी ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला असून आज ते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिल्यास बंड करण्याची घोषणा केली होती. गायत्री शिंगणे यांनी याबाबत शरद पवार यांची भेट घेऊन राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी देखील केली होती. मात्र, आता शिंगणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळं शिंगणे यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





