MPSC Success Story : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीच्या जोरावर यश मिळवत शिंदेवाडी (ता. खटाव) येथील राजेंद्र लिंगाप्पा पुजारी याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात १७वी रँक मिळवत राज्य कर सहाय्यक पद पटकावले आहे. या यशामुळे परिसरात त्याचे कौतुक होत असून, त्याने अनेकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. (MPSC Success Story) राजेंद्रचे आई-वडील १९८५ साली रोजगाराच्या शोधात कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. सालगडी म्हणून काम करत त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत कुटुंबाचा गाडा ओढला. स्वतः निरक्षर असतानाही त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी अथक प्रयत्न केले. राजेंद्रचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, शिंदेवाडी येथे झाले. माध्यमिक शिक्षण ताथवडा (फलटण) येथील आश्रमशाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण खटावमधील शहाजीराजे महाविद्यालयात पूर्ण झाले. पुढे त्याने शिवाजी विद्यापीठ येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले. (MPSC Success Story) लहानपणापासून शेतीकाम करत, मर्यादित साधनांमध्ये शिक्षण घेत असतानाही राजेंद्रने स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचा निर्धार कायम ठेवला. कोणत्याही क्लासशिवाय स्वअभ्यासाच्या जोरावर त्याने तयारी केली. २०२१ पासून सलग पाच वेळा मुख्य परीक्षा दिल्या, मात्र अपयश आले तरीही त्याने हार मानली नाही. अखेर डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या MPSC गट-क परीक्षेत त्याने यश संपादन केले. ६ एप्रिल रोजी लागलेल्या निकालात खुल्या प्रवर्गातून राज्यात १७वी रँक मिळवत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. या यशामागे आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याचे राजेंद्रने सांगितले. तसेच मित्रपरिवार आणि गावकऱ्यांनीही कठीण काळात साथ दिल्याचे तो म्हणाला. (MPSC Success Story) राजेंद्रच्या या यशाबद्दल सरपंच माधुरी फाळके, उपसरपंच अजय फाळके, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय फाळके, बैलगाडा खटाव संघटना अध्यक्ष रविंद्र फाळके, माजी सरपंच श्रीरंग फाळके, संतोष फाळके, नारायण गाडे, आशा फाळके, प्रेमला पवार, तानाजी फाळके, माजी उपसरपंच हणमंत फाळके, सुर्यकांत नलवडे, छाया गाडे, सुनिता फाळके, शरद फाळके, लक्ष्मण फाळके, तेजेस फाळके, सुनिल फाळके, रणजित माने, चेअरमन विठ्ठल फाळके, व्हा. चेअरमन विजय फाळके सर्व ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिंदेवाडी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.