शेतकऱ्याच्या मुलीचे यश! बोरखडी पिनगाळे येथील प्रतिभा थिटेची महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदी निवड

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बोरखडी पिनगाळे येथील शेतकरी अशोकराव थिटे यांच्या कन्या प्रतिभा अशोक थिटे हिची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत (महावितरण) विद्युत सहाय्यक पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सरळ सेवा भरतीअंतर्गत 21 मे 2025 रोजी विद्युत सहाय्यक पदासाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात प्रतिभा थिटे यांनी यश मिळवत विद्युत सहाय्यक पदावर स्थान पटकावले आहे. बोरखडी पिनगाळे येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रतिभा यांच्या या यशाने गावाचा आणि कुटुंबाचा मान उंचावला आहे.
अशोकराव थिटे यांना पाच मुली असून, त्यांनी प्रत्येक मुलीला चांगले शिक्षण देण्यावर भर दिला. प्रतिभा यांनी प्राथमिक शिक्षण बोरखडी येथील जिल्हा परिषद शाळेत घेतले, तर माध्यमिक शिक्षण साखरा येथील कुमारेश्वर विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कळमनुरी येथील शासकीय आयटीआय महाविद्यालयात शिक्षण घेतले.
शालेय जीवनापासूनच हुशार असलेल्या प्रतिभा यांनी सातत्यपूर्ण मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले. प्रतिभा यांच्या या यशाबद्दल गावकरी, कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून, त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशाने शेतकरी कुटुंबातील मुलींसाठी शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर मोठी स्वप्ने साकार करण्याचा आदर्श निर्माण झाला आहे.





