Delhi News : राजधानी एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलले; नवी दिल्लीतील आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेचा निर्णय
१० ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांच्या आसपास तीव्र रस्ते वाहतूक कोंडी होण्याचा अंदाज आहे.

Delhi News – राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या दोन राजधानी एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला असून एक एक्सप्रेस पूर्णपणे रद्द केली आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई सेंट्रल – नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस (१२९५१), मुंबई सेंट्रल – हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस (१२९५३) या दोन्ही गाड्या आता ५ तास उशिराने सुटतील. बांद्रा टर्मिनस – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (१२२४७) ही गाडी रद्द करण्यात आली.
याशिवाय, पश्चिम रेल्वेने इतर काही रेल्वे गाड्या देखील रद्द केल्या आहेत, ज्यामध्ये डॉ. आंबेडकर नगर – नवी दिल्ली एक्सप्रेस (२०१५५), इंदूर – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (०९३०९), इंदूर – नवी दिल्ली एक्सप्रेस (१२४१५) आणि साबरमती – नवी दिल्ली एक्सप्रेस (१२९५७) यांचा समावेश आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार, १० ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांच्या आसपास तीव्र रस्ते वाहतूक कोंडी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाला निघण्यापूर्वी गाड्यांचे सुधारित वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात १० ऑक्टोबर रोजी कॉक्रोच जनता पार्टीने नवी दिल्लीतील जंतरमंतरवर एका भव्य आंदोलनाची हाक दिली आहे. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या नावाखाली मतदारयादीत फेरफार केल्याचा आणि फॉर्म ६ मध्ये बदल करण्यासाठी आपल्या दोन सहकाऱ्यांना डावलल्याचा आरोप ज्ञानेश कुमार यांच्यावर करण्यात येत असून, याच मुद्द्यावरून हे आंदोलन होणार आहे.





