Romi Bhinder Controversy : राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर बंदीची टांगती तलवार; वैभव सूर्यवंशीच्या शेजारी नेमकं काय घडलं?
Romi Bhinder Controversy : रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंडर हे डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरताना टीव्ही कॅमेऱ्यात दिसले होते.

Romi Bhinder Mobile Controversy IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात मैदानाबाहेरील एका घटनेने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंडर यांनी डगआउटमध्ये मोबाईल वापरल्याचे कॅमेऱ्यात कैद झाल्याने, त्यांच्यावर बीसीसीआयकडून कडक कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
राजस्थान रॉयल्सने आरसीबीविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवला असला, तरी या विजयाच्या आनंदावर नियमांच्या उल्लंघनामुळे विरजण पडले आहे. राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंडर हे डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरताना टीव्ही कॅमेऱ्यात दिसले. ‘पीएमओए’ (PMOA) प्रोटोकॉलनुसार, थेट सामन्यादरम्यान डगआउटमध्ये मोबाईल वापरणे हा भ्रष्टाचार विरोधी नियमांचा भंग मानला जातो. ज्या वेळी ही घटना घडली, तेव्हा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी त्यांच्या शेजारीच बसलेला होता.
— Cricket Iconic (@ankanghosh335) April 11, 2026
नेमका नियम काय सांगतो?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले, “हो, भिंडर यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केले आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, टीम मॅनेजर ड्रेसिंग रूममध्ये फोन वापरू शकतो, परंतु डगआउटमध्ये मोबाईल नेण्यास किंवा वापरण्यास सक्त मनाई आहे.” रोमी भिंडर हे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून राजस्थान रॉयल्सशी जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांना या नियमांची माहिती असणे अपेक्षित होते.
दोषी आढळल्यास काय होणार शिक्षा?
ही चूक अनवधानाने झाली असली, तरी त्यावर कारवाई होणे अटळ असल्याचे मानले जात आहे. एसीयू (ACU – भ्रष्टाचार विरोधी युनिट) आणि मॅच रेफरी यांच्या अहवालानंतर भिंडर यांना केवळ ताकीद दिली जाईल की त्यांच्यावर काही सामन्यांची बंदी घातली जाईल, याचा निर्णय आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल घेणार आहे. वैभव सूर्यवंशीने विजयानंतर भिंडर यांना आपला ‘स्थानिक मार्गदर्शक’ (Local Mentor) म्हटल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.





