Rajasthan Election Result 2023 : राजस्थानमध्ये अशोक गेहलोत, सचिन पायलट, यांच्यासह काँग्रेसच्या बड्या नेत्यांची काय अवस्था ?; जाणून घ्या

Rajasthan Election Result 2023 : चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे सुरुवातीचे कल आता हळूहळू निकालात रूपांतरित होत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये राजस्थान आणि छत्तीसगड काँग्रेस पक्षाच्या हातातून निसटल्याचे स्पष्ट दिसून येते. छत्तीसगडमध्ये कडवी लढत असली तरी राजस्थानमध्ये भाजप पूर्ण बहुमताच्या पुढे असल्याचे दिसत आहे. राजस्थानमधील विधानसभेच्या 230 जागांपैकी भाजप 113 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 71 जागांवर आघाडीवर आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाचे अनेक मोठे चेहरे त्यांच्या मतदार संघात पिछाडीवर आहेत. यातील सर्वात मोठे नाव विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांचे आहे, जे नाथद्वारच्या जागेवरून पिछाडीवर आहेत. प्राथमिक मतमोजणीला ३ तासांहून अधिक कालावधी पूर्ण झाल्यानंतर सीपी जोशी ३ हजारांहून अधिक मतांनी मागे आहेत.याठिकाणी भाजपचे उमेदवार विश्वराज सिंह मेवाड पुढे आहेत.
राजस्थान काँग्रेसच्या आणखी एका मोठ्या चेहऱ्याबद्दल बोलायचे झाले तर प्रताप सिंह खाचरियावास यांचे नाव खूप मोठे आहे. प्रताप सिंह खाचरियावास हेही गेहलोत मंत्रिमंडळात मंत्री आहेत. सिव्हिल लाईन्स विधानसभा मतदारसंघातून ते सुमारे ४ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. या ठिकाणावरून भारतीय जनता पक्षाचे गोपाल शर्मा आघाडीवर आहेत.
सुरुवातीच्या कलांमध्ये, राजस्थान काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग डोटासारा हे लक्ष्मणगड विधानसभा मतदारसंघातून मागे पडले होते, परंतु 11 वाजता मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी या जागेवर आघाडी घेतली. त्यांनी भाजपचे सुभाष महारिया यांना मागे टाकले. तर राजस्थान काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट टोंक विधानसभेच्या जागेवरून पिछाडीवर होते, पण त्यांनीही नंतर आघाडी मिळवली. ते भाजपचे अजितसिंग मेहता यांच्यावर सुमारे ३ हजार मतांनी आघाडीवर आहेत.




