Rajasthan : अन्… चिडलेल्या CM गेहलोत यांनी जमिनीवर आपटला माइक; नेमकं काय घडलं, पाहा Video…

जयपूर :- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत एका सरकारी समारंभात बोलत असताना माइक खराब झाला. त्यामुळे चिडलेल्या गेहलोत यांनी तो माइक जमिनीवर आपटला.
सरकारी योजनांच्या अंमलबजावणीविषयी महिला वर्गाचे मत जाणून घेण्यासाठी बाडमेरमध्ये गेहलोत यांनी एका गटाशी संवाद साधला. त्या समारंभावेळी माइक बंद पडल्याने गेहलोत यांना राग अनावर झाला. त्यातून त्यांनी हातातील माइक फेकून दिला. तो माइक तातडीने पुढे सरसावत जिल्हाधिकाऱ्यांनी उचलला.
Rajasthan : अन्… चिडलेल्या CM गेहलोत यांनी जमिनीवर आपटला माइक, नेमकं काय घडलं, पहा Video #AshokGehlot pic.twitter.com/EwVRFrb9pr
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) June 4, 2023
तसेच, गेहलोत यांच्यासाठी दुसऱ्या माइकची व्यवस्था करण्यात आली. त्या घडामोडींचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. त्यामुळे गेहलोत यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर माइक भिरकावल्याच्या चर्चांना उधाण आले. त्या चर्चा फेटाळून लावत मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने माइक फेकण्यात आला नसल्याचे नमूद केले.
दरम्यान, त्याच समारंभात आणखी एकदा गेहलोत चिडले. केवळ महिलांशी संवाद आयोजित करण्यात आला होता. तसे असूनही महिलांच्या मागील बाजूस काही पुरूष उभे असल्याचे पाहून गेहलोत यांनी त्यांना जाण्यास सांगितले. पुरूषांना हटवण्यासाठी गेहलोत यांनी पोलीस अधीक्षक कुठे आहेत, अशी विचारणा केली. तसेच, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी बहुधा एकसारखेच आहेत, अशी नापसंती दर्शवणारी टिप्पणीही केली.




