Rajasthan accident: राजस्थानमध्ये भीषण अपघात; महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू, ६ जण गंभीर जखमी
Rajasthan accident: राजस्थानमध्ये कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली.

Rajasthan accident: राजस्थानमध्ये कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला असून, ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
खाटू श्यामजीचे दर्शन घेऊन महाराष्ट्राकडे परतत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. नाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूपुरा गावाजवळ रविवारी रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, १६ प्रवाशांना घेऊन जाणारी क्रूझर गाडी महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की, ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघात नेमका कसा झाला?
महाराष्ट्रातील धुळे या ठिकाणी वास्तव्यास असलेली तीन कुटुंबं स्वतंत्र वाहनांतून खाटू श्यामजी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शनावरून परतताना, रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ त्यांची क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली.
धडक इतकी भीषण होती की, क्रूझर गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि त्यातील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहून मदतीसाठी पुढे आलेल्या व्यक्तींचे पायही थरथर कापल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच नंता पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
#WATCH | Kota, Rajasthan | A victim says, “We were travelling from Khatu Shyam towards Dhar. On the way, two of our vehicles fell behind, while the other three moved ahead. Then, we received a call from a woman in the group—an accident had occurred—so we rushed to the scene…” https://t.co/BBZAGWWlp2
— ANI (@ANI) November 22, 2026
कोटाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. मृत आणि जखमी सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती त्यांनी दिली. हे कुटुंब खाटू श्यामजीचे दर्शन घेऊन महाराष्ट्राच्या दिशेने निघाले होते.
अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये उषा बाई, सुशीला, कैलाश, सान्वी, सज्जन, अनिता, जान्हवी, बाबूलाल आणि माधवी यांचा समावेश आहे. Rajasthan accident:
दरम्यान, अपघातातून बचावलेल्या एका मुलाने एएनआयशी बोलताना घटनेची माहिती दिली. आम्ही खाटू श्यामजीवरून धारच्या दिशेने जात होतो. प्रवासादरम्यान आमच्या दोन गाड्या मागे राहिल्या, तर तीन गाड्या पुढे निघून गेल्या होत्या. त्यानंतर एका महिलेचा फोन आला आणि अपघात झाल्याचे समजले. ही माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो, असे त्याने सांगितले.





