राजन साळवींची साडेसहा तास चौकशी; पत्नी आणि मुलाचाही आरोपी म्हणून उल्लेख

मुंबई – ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आज एसीबीने तब्बल साडे सहा तास चौकशी केली. त्यानंतर एसीबीने त्यांना रत्नागिरी जिल्हा बँकेच्या शाखेत नेले. तिथे त्यांची बँक खाती आणि लॉकरची चौकशी करण्यात आली.
एसीबी चौकशीनंतर राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. राजन साळवी यांच्याकडे उत्पन्नापेक्षा 118 टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात आरोपी म्हणून राजन साळवी, त्यांच्या पत्नी आणि मुलाचेही नाव नमूद करण्यात आले आहे.
एसीबीकडून गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर राजन साळवी म्हणाले की, मी दोषी नाही, त्यामुळे अटकपूर्व जमिनासाठी कोर्टात जाणार नाही. ठाकरेंसोबत राहिल्यामुळे ही कारवाई अपेक्षित होती. त्यामुळे आपली चौकशीला सामोरं जाण्याची तयारी आहे. अशा अटकेला आपण घाबरत नाही. दरम्यान, राजन साळवी यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.





