राज ठाकरेंच्या मनसैनिकाचा अपघातात मृत्यू; ‘ती’ पोस्ट ठरली अखेरची, कुटुंबावर आघात, परिसरात शोककळा

Harish Heda : २१ डिसेंबरला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महायुतीमधील तिनही पक्षाने या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. महाविकास आघाडीला ही निवडणूक धक्का देणारी ठरली. तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवसंजीवनी मिळाल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी मनसेचे उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मात्र, कारंजा नगरपरिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मनसे नेत्याने भावनिक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील मनसेचे पदाधिकारी हरिश हेडा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांनी निवडणुकीतील पराभवानंतर एक भावनिक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘विझलो जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवतं नाही‘ अशा कवितेच्या ओळी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. ही पोस्ट त्यांची शेवटची पोस्ट ठरली आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
कारंजा वाशिम बायपास रस्त्याजवळ रिलायन्स पेट्रोल पंपजवळ एका भरधाव पिकअप वाहनाने हरिश हेडा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडकी इतकी भयानक होती की या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. हरिश हेडा यांनी त्यांच्या काही मित्रांची भेट घेतली. मुलीला शिकवणी वर्गातून घरी सोडले. त्यानंतर अपघाताची घटना घडली.
कारंजा नगरपरिषदेसाठी हरीश हेडा यांच्या पत्नी अलका हेडा या उभ्या होत्या. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. मंगळवारी हरीश हेडा यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मतदारांचे आभारही मानले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हरीश हेडा हे २००८ पासून मनसेचे कार्यकर्ता म्हणून काम करत होते. राज ठाकरे यांच्या विचार आणि भाषण कार्यशैलीवर प्रभावित होऊन त्यांनी मनसे पक्षासोबत काम करण्याचे ठरवले.
हेही वाचा : PMC News: अखेर महापालिकेला महसूलवाढीची आठवण; पाच वर्षांनी समितीची पहिली बैठक





