BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) आणि मनसे युतीने महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. ही युती जाहीर झाल्यानंतर आता जागावाटपाची प्रक्रिया वेगाने पूर्ण होत असताना, राज ठाकरे यांच्या मनसेकडून पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मनसेला सोडण्यात आला असून, या वॉर्डातून मनसे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेना (UBT)-मनसे युतीसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला असल्याचे म्हटले जात आहे. २०१७ च्या निवडणुकीत या वॉर्डातून ठाकरे गटाच्या प्रिती पाटणकर विजयी झाल्या होत्या. शिवसेनेत नाराजीचे वादळ वॉर्ड १९२ मनसेला देण्याच्या निर्णयामुळे ठाकरे गटात नाराजी सुरू झाली आहे. या वॉर्डासह वॉर्ड १९४ वरूनही दोन्ही पक्षांकडून दावा होता. अंतिम चर्चेत वॉर्ड १९२ मनसेला आणि १९४ ठाकरे गटाला (शिवसेना UBT) देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, स्थानिक शिवसैनिक आणि माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करण्याची तयारी करत आहेत. ठाकरे बंधूंची युती आणि जागावाटप उद्धव आणि राज ठाकरे यांनी २० वर्षांनंतर एकत्र येऊन शिवसेना (UBT) आणि मनसे यांची युती जाहीर केली आहे. सूत्रांनुसार, मुंबईच्या २२७ प्रभागांपैकी शिवसेना (UBT) ला १४५-१५० जागा आणि मनसेला ६५-७० जागा मिळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी (भांडूप, विक्रोळी, दादर) जागांवर अजून चर्चा सुरू असून, पूर्ण जागावाटप लवकरच अंतिम होईल. असा असेल निवडणूक कार्यक्रम – नामनिर्देशन: २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ – छाननी: ३१ डिसेंबर २०२५ – अर्ज मागे घेणे: २ जानेवारी २०२६ पर्यंत – अंतिम यादी: ३ जानेवारी २०२६ – मतदान: १५ जानेवारी २०२६ – मतमोजणी आणि निकाल: १६ जानेवारी २०२६ २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने ८४, भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मुंबईच्या राजकारणात मोठा बदल दिसत आहे. यशवंत किल्लेदार यांची उमेदवारी निश्चित झाल्यास, राज ठाकरेंची मनसे निवडणुकीत सक्रिय झाल्याचे स्पष्ट चित्र समोर येईल.