Raj thackeray : मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवतीर्थावर आयोजित सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार भाषण करत राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली. राज्यातील विकास, बेरोजगारी, वाढती वाहतूक कोंडी आणि बिघडलेले शहर नियोजन या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले. शहरांची सध्याची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगताना ठाकरे म्हणाले की, शहरांचा नियोजनबद्ध विकास थांबला असून कुठेही अनियंत्रित बांधकामे सुरू आहेत. इमारतींना परवानग्या देताना कोणतेही ठोस नियोजन दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली. इराण-इस्रायल संघर्षावर भाष्य : इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरेंनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारताने इराणसोबतचे संबंध लक्षात घेऊन अधिक स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते, भारताच्या ऊर्जा गरजांमध्ये इराणचे महत्त्व मोठे असून त्या देशाने पूर्वी भारताला साथ दिली आहे. अशा परिस्थितीत इराणला पाठिंबा न दिल्याचे परिणाम भविष्यात जाणवू शकतात, असेही त्यांनी म्हटले. देश नेमका कुठे चाललाय? देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी महागाई, ऊर्जा संकट आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचाही उल्लेख केला. “लोकांना स्वयंपाकासाठी गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत, वातावरणात असुरक्षितता वाढली आहे,” असे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा : भाषणादरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढत सांगितले की, राजकारणात सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांनी दिलेला एक सल्ला आजही लक्षात आहे, भाषण कसे केले यापेक्षा लोकांना त्यातून काय मिळाले हे महत्त्वाचे असते. असं ते म्हणाले. इन्स्टाग्राममधून बाहेर पडा : आपल्याला आज करमणुकीमध्ये गुंतवून ठेवलं आहे. आयपीएल, कुठले तरी पिक्चर आणि इतर माध्यमातून गुंतवून ठेवलं जातंय. त्यामुळे पहिल्यांदा इन्स्टाग्राममधून बाहेर पडा. तुम्ही गुंतवून राहिला तर सरकारला प्रश्न विचारू नये यासाठी हे सगळं आखलेलं आहे. हे फक्त भारतात नव्हे तर जगभरात सुरू आहे. सर्वसामान्य माणसांनी मोबाईलमध्ये, करमणुकीमध्ये अडकून राहावं, मग कुणीही विचार करणार नाही. पूर्वी लोक रस्त्यावर यायचे, पण आता मोबाईलवर निषेध व्यक्त केला जात आहे. माध्यमांची वाट लावून टाकली आहे. सरकारला विरोध केला तर जाहिराती बंद करू अशी धमकी दिली जाते. या अशा विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकला आहे.