मनसेच्या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमासाठी अद्याप पुणे पोलिसांची परवानगी नाही

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यातील खालकर मारुती चौकात संध्याकाळी 6 वाजता महाआरती आणि हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मनसेकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र पुणे पोलीसांकडून या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमासाठी अद्याप मंडप आणि लाऊडस्पीकरसाठी परवानगी देण्यात आलेली नाही आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेल्या सभेत मशिदींवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान ठाण्यातील उत्तरसभेमध्ये ठाकरे यांनी आक्रमक भूमिकी घेत 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावणार असा असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला होता. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात महाआरती घेण्यात येणार आहे. मात्र या कार्यक्रमासाठी पुणे पोलीसांकडून अद्याप परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे हा कार्यक्रम होणार की नाही असा प्रश्न सर्वांना पडला आहे.





