Raj Thackeray : सरकारच मानसिक रुग्ण झालेय, त्यांनाच रुग्णालयात भरती करा; दिल्लीतील लाठीमारावरून राज ठाकरे यांचा घणाघात
Raj Thackeray : दिल्लीतील जंतर-मंतर येथे न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत.

Raj Thackeray : दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी सोमवारी लाठीमार केला होता. या सगळ्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांना धारेवर धरले आहे. (Raj Thackeray)
राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले की, केंद्र सरकारने पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात नेले. वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केले, असे सरकारचे म्हणणे आहे. (Raj Thackeray)
सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेले, त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला लाठीचार्ज पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झाले आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे, असे दिसत आहे. (Raj Thackeray)
आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलने कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे. (Raj Thackeray)
मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की, ज्यांचा राजीनामा घेणे हे सरकारला स्वतःचे अपयश वाटत आहे? मणिपूर पेटलेले असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असेच अभय दिले होते. (Raj Thackeray)
बर हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचे हे कोणी सांगायचे नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. (Raj Thackeray)
आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारते. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती परीक्षा पे चर्चा इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे. आणि सरकारने हे देखील समजून घ्यावे की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचे, एका परीक्षेपुरते नाही आहे. (Raj Thackeray)
लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे. गृहखात्याच्या आदेशावरून आंदोलकांना निर्दयीपणे मारले जात आहे आणि तरीही आंदोलक मुले-मुली इंचभर हलत नाही आहेत यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा, असे ठाकरेंनी म्हटले. (Raj Thackeray)





