ही माझ्या शिवरायांची छत्रपती होण्याआधीची गोष्ट आहे… राज ठाकरेंनी ‘हर हर महादेव’साठी असा रेकॉर्ड केला आवाज

मुंबई – तब्बल ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर २५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील सह्यादीच्या आवाजासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हाईस दिला आहे. टीझरमध्ये याची सर्वांना प्रचीती आली होती. मात्र आता हर हर महादेवच्या टीमने एक व्हिडीओ समोर आणला आहे ज्यात राज ठाकरे स्वतः माईकसमोर उभे राहून आवाज स्वरबद्ध करताना दिसत आहेत.
राज ठाकरे यांनी आपल्या भारदस्त आवाजाने अनेक राजकीय सभा गाजवल्या आहेत. परंतु चित्रपटामध्ये आवाज देणारे राज ठाकरे आपल्याला पहिल्यांदाच यारूपाने पाहायला मिळत आहेत. ही त्या देव माणसाची देव होण्याआधीची गोष्ट आहे. ही माझ्या शिवरायांची छत्रपती होण्याआधीची गोष्ट आहे… मी सह्याद्री माझ्या शिवबाची गोष्ट आज तुम्हाला सांगतोय. असा भारदस्त आवाज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
‘हर हर महादेव’ चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.





