मंचर, (प्रतिनिधी) – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे हर हर महादेव व भीमाशंकरकी जयच्या जय घोषात परिसर दुमदुमला होता. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी दोन लाख भाविकांनी जला आभिषेक करून पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. भीमाशंकर येथे दाट धुके, बोचरी थंडी अधूनमधून येणार्या श्रावण पावसाच्या सरीत मंत्रमुग्ध होऊन भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. तर दाटधुक्यात हरवलेला मंदिर परिसर भाविकांना मोहुन टाकत होता. मंदिर व परिसरामध्ये देवस्थान समिती, पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. मंदिर परिसरात देवस्थान समितीच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी पासची सुविधा व मुखदर्शन दर्शन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश पवार व निखील मुगदुम, पोलीस कर्मचारी व होमगार्ड आदि चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा काळात भीमाशंकरचे अध्यक्ष सुरेश कौदरे, सरपंच दत्तात्रय हिले यांनी पायरी मार्गावरील दुकानदांराना भाविकांना अडथळा करू नका, अशा सूचना देत होते. तर भाविकांना दर्शन बारीत सोयीचे होईल यासाठी प्रयत्नशील होते. 30 बसेसची सोय एसटी महामंडळाकडून नारायणगाव, पुणे मंचर, पिंपरी-चिंचवड, नाशिक आदी ठिकाणाहून एसटीच्या 30 बसेस यात 8 मिनीबस व 22 मोठ्या बसेसचे नियोजन वाहतूक नियंत्रक तुकाराम पवळे व मारुती खळदकर करत होते. यामुळे भाविकाना वाहनतळ ते मंदिर स्टँडपर्यंत सुविधा मिळत होती. सुविधांअभावी भाविक नाराज श्री क्षेत्र भीमाशंकर हे एक ज्योतिर्लिंग असून या ठिकाणी देशाच्या कानाकोपर्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. येथे आल्यानंतर येथे पुरेशा सुविधा मिळत नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.