Mumbai Politics : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. मात्र, या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने ठाकरेसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरेसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेत ठाकरेसेनेकडे ३ स्वीकृत नगरसेवक पदे होती. यापैकी एक पद मनसेला मिळावे अशी राज ठाकरेंची अपेक्षा होती. मात्र, ठाकरे गटाने मनसेला विश्वासात न घेता परस्पर नगरसेवक जाहीर केले. याउलट, आता प्रभाग समिती निवडणुकीत मदतीसाठी मातोश्रीवरून विचारणा झाल्याने मनसे नेत्यांमध्ये नाराजी आहे. तसेच, राज ठाकरे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात जाऊन भेट घेतल्याने उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी अबोला धरल्याचे बोलले जात आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे काही महत्त्वाच्या प्रभाग समित्या महायुतीच्या (भाजप-शिंदे गट) ताब्यात जाण्याची शक्यता आहे, प्रभाग समिती एस आणि टी येथे मविआचे संख्याबळ ९ आहे, तर महायुतीचे १० आहे. मनसेचा १ नगरसेवक तटस्थ राहिल्याने ही समिती थेट महायुतीकडे जाईल. जर मनसे मविआसोबत असती, तर सामना बरोबरीत होऊन चिठ्ठीद्वारे निकाल निघाला असता. याबरोबरीनेच प्रभाग समिती एफ-दक्षिण आणि एफ-उत्तर येथे मविआ आणि महायुतीचे संख्याबळ प्रत्येकी ८ आहे. सपाचा १ नगरसेवक कोणाकडे जातो आणि मनसेची तटस्थता काय वळण घेते, यावर चिठ्ठीचा कौल अवलंबून असेल. राज ठाकरेंची भूमिका काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, निवडणुका संपल्या आहेत, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज नाही. शहरातील रस्ते, उड्डाणपूल आणि पार्किंगच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी मी उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. लोकांसाठी काम करायचे असेल तर भेट घ्यावीच लागते. राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे त्यावेळी सर्वांनी भूवया वर केल्या होत्या. आता प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार असून, पुढील तीन दिवसांत होणाऱ्या या निवडणुका मुंबईच्या राजकारणातील पहिली मोठी लिटमस टेस्ट मानली जात आहे.