Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मनसेच्या २०व्या वर्धापनदिनाच्या (९ मार्च २०२६) पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेला राज्यव्यापी स्वरूप देण्याची घोषणा केली आहे. ही मोहीम १० मार्च २०२६ पासून सुरू होणार असून, त्याची सुरुवात राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतः रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करणार आहेत. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर (फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी) पोस्ट करून ही माहिती दिली. त्यांनी लिहिले, “माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र! आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २०वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन आहे. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरू होत आहे. मी उद्या सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात होणार आहे.” रायगडाचे विशेष महत्त्व राज ठाकरे यांनी रायगड किल्ल्याचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. “रायगडाने छत्रपती शिवरायांचं वास्तव अनुभवलं आहे. त्यांचा शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार देखील हा किल्लाच आहे. या पावन ठिकाणी सदस्य नोंदणी सुरू करत आहोत,” असे ते म्हणाले. सकाळी १० वाजता किल्ल्याच्या पायथ्याशी हा शुभारंभ होणार असून, प्रमुख उपस्थितीत राज ठाकरे स्वतः असतील. सदस्य नोंदणी कोणासाठी ? सदस्य नोंदणी फक्त मनसेच्या ‘महाराष्ट्र सैनिकां’पुरती मर्यादित नसून, ज्यांना महाराष्ट्राला नव्याने आकार द्यायचा आहे, सद्य परिस्थितीबद्दल राग आहे आणि नवनिर्माणाच्या ध्यासाने प्रेरित आहेत अशा सर्वांना जोडून घेण्याचा उद्देश आहे. “जे जे नव्याने जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या,” असे राज ठाकरेंनी सांगितले. Raj Thackeray ही नोंदणी डिजिटल स्वरूपातही (ऑनलाइन) होणार आहे. तसेच, पारंपरिक पद्धतीने शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावण्यापलीकडे जाऊन, गजबजलेल्या ठिकाणी – मार्केट, शाळा, मंदिरे, कॉलेज, मैदाने, बागा इत्यादी – सदस्य नोंदणी टेबल्स लावण्याचे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. “येणाऱ्या-जाणाऱ्यांशी संवाद साधत सभासद नोंदणी करा. यासाठी जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी, शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि पक्ष नेत्यांना कळवा,” असे त्यांनी स्पष्ट केले. आकड्यापेक्षा भावना महत्त्वाची राज ठाकरे यांनी सांगितले की, प्रश्न केवळ आकड्यांचा नाही. “तशीही सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे, सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे, हे स्पष्ट होईल. त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल, यासाठी प्रयत्न करा.” मनसेच्या या सदस्य नोंदणी मोहिमेमुळे पक्षाची ताकद महाराष्ट्रभर वाढणार असल्याचे बोलले जात आहे. हे पाऊल मनसेला नवीन ऊर्जा देणारे आणि मराठी अस्मितेच्या लढ्यात मजबूत करणारे ठरणार असल्याचे दिसते. वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंची ही रणनीती पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.