Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडला, तातडीने मुंबईला रवाना; काय घडलं नेमकं?

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र राज ठाकरे यांना हा दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईला रवाना व्हावे लागले.
काय घडलं नेमकं?
आज सकाळी राज ठाकरे नाशिकला पोहोचले. त्यानंतर त्यांनी शहरातील स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. तर ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे दौरा आटोपता घेत तातडीने मुंबईला रवाना झाले.
राज ठाकरे हे नाशिकनंतर पुण्याच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र आता राज ठाकरे नाशिक दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. कौटुंबिक कारणामुळे राज ठाकरे तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र अद्याप नेमकं कारण समजू शकलेले नाही. तसेच राज ठाकरेंच्या पुढील दौऱ्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.





