मुंबई : महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील त्रुटींवरून विरोधकांनी निवडणूक आयोग आणि भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे. १ नोव्हेंबरला मुंबईत महाविकास आघाडी व सर्वपक्षीय विरोधकांच्या संयुक्त मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे सहभागी होणार असल्याची घोषणा झाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र, या मोर्चावर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी कडाडून टीका केली आहे.”राज, उद्धव, शरद पवार म्हणतात म्हणून मुंबईत गैरकाम चालणार नाही. हा सत्याचा नव्हे, ढोंग्याचा आणि लबाडांचा मोर्चा आहे,” असे म्हणत सदावर्ते यांनी विरोधकांना लक्ष्य केले. उच्च न्यायालयाने आझाद मैदानातच मोर्चा काढण्याचे निर्देश दिले असून, त्यापेक्षा दुसरीकडे मोर्चा काढता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.राज ठाकरेंच्या ‘मतदार यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणुका थांबवा’ या वक्तव्यावर सदावर्ते यांनी बोचरा पलटवार केला. निवडणूक लढण्याची ताकद नसल्याने हे नाटक सुरू आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे दळभद्री उद्या मरणार म्हणून आज गोंधळ घालत आहेत, अशी खरमरीत टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे हा सुमार व्यंगचित्रकार आणि नालायक आहे. जरांगे पाटलांच्या वेळी न्यायालयाने ठिकाण निश्चित केलं होतं, तसंच याही वेळी नियम पाळले जातील. जास्त डुरडुर केली तर मुसक्या आवळल्या जातील, असा इशारा सदावर्ते यांनी दिला.