Raj Thackeray: ‘माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील कळणार नाही…’; राज ठाकरेंनी पवार, उद्धव यांना सुनावलं

Raj Thackeray । maratha reservation : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते बीड शहरात पोहचणार होते.
मनसैनिक राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी थांबले होते. मात्र, शहरात दाखल होताना मोठ्या जमावाने राज ठाकरे यांचा ताफा अडविला आणि राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.
यातील काही लोकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देखील दिल्या. त्यामुळे मराठा आंदोलक असावेत अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्यांच्यापैकी अनेकांकडे शिवसेना (उबाठा) पक्षाचा मशाल हे चिन्ह असलेले झेंडे दिसत होते. त्यामुळे राज ठाकरे यांचा ताफा नक्की कुणी अडविला यावर चांगलीच चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळाले.
राज ठाकरे बीडमध्ये पोहचल्यावर ज्या ठिकाणी त्यांचे स्वागत होणार होते, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मनसैनिक जमले होते. मात्र त्या ठिकाणी देखील जमावाने सुपाऱ्या फेकताना ‘सुपारीबाज- सुपारीबाज’ अशा घोषणा दिल्या.
घोषनांनंतर मात्र दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसैनिक आणि राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी जमलेले विरोधक एकमेकांना भिडले. मात्र पोलिसांनी मोक्याच्या क्षणी हस्तक्षेप करताना दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत केले.
आता या घडलेल्या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे यांनी भाष्य केले. राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी ‘माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील यांना कळणार पण नाही’, असा निर्वाणीचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. तसेच यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे पुन्हा एकदा वक्तव्य केले.
राज ठाकरे म्हणाले की, “2004 किंवा 2005 असेल तेव्हा पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळी आला होता. मुंबईत मोर्चा आला होता. माझ्याकडे या मोर्चाचा फोटो असेल. या मोर्चाच्या व्यासपीठावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोकं होते.
सर्वांनी सांगितलं मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. कुणी अडवलं. तुमचं एकमत आहे तर थांबवलं कुणी? 15-20 वर्ष झाले. तुम्ही आरक्षण का दिलं नाही’ असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “नरेंद्र मोदी दहा वर्षापासून संसदेत आहे. मोदी म्हणाले शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो. मग शरद पवार यांनी मोदींना मराठा आरक्षणाबाबत शब्द का नाही टाकला. उद्धव ठाकरे भाजपसोबत होते, तेव्हा त्यांनी पाच वर्षात मराठा आरक्षणासाठी शब्द का टाकला नाही?
जरांगेंच्या मागून राजकारण करत आहेत. तुमचं राजकारण लखलाभ असो. पण माझ्या नादी लागू नका. एवढंच सांगायचं आहे. माझी पोरं काय करतील यांना कळणारपण नाही. नंतर घरी येऊन आरशापुढे पाट, पोट आणि गाल बघावे लागेल. अत्यंत चिखल केला राजकारणाचा”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.
काय आहे नेमका विषय, पाहा….
सध्या महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या भागात ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स होत आहेत हे का होत आहेत? मुळच्या लोकसंख्येसाठी नाही होत. बाहेरून येणाऱ्यांसाठी होत आहेत. आपल्या ठाणे जिल्ह्यात देशामधला असा एकमेव जिल्हा आहे ज्यात सात ते आठ महानगरपालिका आहेत. ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि मग महानगरपालिका हे स्तर लोकसंख्येनुसार वाढत जातात.
एका जिल्ह्यात सात ते आठ महानगर पालिका असतील तर ही लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आहे, मग त्या शहरांत आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यासाठी सरकारचा पैसा खर्च होतो , असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
हे देखील नक्की वाचा….
राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर आंदोलनं; मनोज जरांगे म्हणतात, ‘मुंबईत जाऊन गचांडी धरुन….’





