राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर आंदोलनं; मनोज जरांगे म्हणतात, ‘मुंबईत जाऊन गचांडी धरुन….’

Manoj Jarange on Raj Thackeray । maratha reservation : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते बीड शहरात पोहचणार होते. मनसैनिक राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी थांबले होते. मात्र, शहरात दाखल होताना मोठ्या जमावाने राज ठाकरे यांचा ताफा अडविला आणि राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.
यातील काही लोकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देखील दिल्या. त्यामुळे मराठा आंदोलक असावेत अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्यांच्यापैकी अनेकांकडे शिवसेना (उबाठा) पक्षाचा मशाल हे चिन्ह असलेले झेंडे दिसत होते. त्यामुळे राज ठाकरे यांचा ताफा नक्की कुणी अडविला यावर चांगलीच चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळाले.
राज ठाकरे बीडमध्ये पोहचल्यावर ज्या ठिकाणी त्यांचे स्वागत होणार होते, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मनसैनिक जमले होते. मात्र त्या ठिकाणी देखील जमावाने सुपाऱ्या फेकताना ‘सुपारीबाज- सुपारीबाज’ अशा घोषणा दिल्या. घोषनांनंतर मात्र दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसैनिक आणि राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी जमलेले विरोधक एकमेकांना भिडले. मात्र पोलिसांनी मोक्याच्या क्षणी हस्तक्षेप करताना दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत केले.
दरम्यान, आता या प्रकरणावर मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी सूचक विधान केलं आहे. ‘राज ठाकरेंचा ताफा मराठा आंदोलकांना आडवू नये’ असं आवाहन करताना त्यांनी राज ठाकरेंनाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरेंचा ताफा आडवला जात असल्याच्या संदर्भात जरांगे पाटलांना प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले ‘कोणतंही आंदोलन राज्यात सुरु नाही त्यामुळे राज ठाकरेंना आडवू नये असं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. मराठ्यांनी आडवायचं ठरवलं, जाब विचारायचं ठरवलं तर मराठे मुंबईत जाऊन गचांडी धरुन यांना जाब विचारु शकतो एवढा विश्वास मला आहे. ते तुम्हाला दिसेल. आता बऱ्याच जणांना मराठ्यांची ताकद कमी झाली की काय? मराठ्यांना पाठिंबा आहे की नाही? मुंबईत सुद्धा किती मराठा आहेत दाखवतो,” असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.
काय आहे नेमका विषय, पाहा….
सध्या महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या भागात ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स होत आहेत हे का होत आहेत? मुळच्या लोकसंख्येसाठी नाही होत. बाहेरून येणाऱ्यांसाठी होत आहेत. आपल्या ठाणे जिल्ह्यात देशामधला असा एकमेव जिल्हा आहे ज्यात सात ते आठ महानगरपालिका आहेत. ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि मग महानगरपालिका हे स्तर लोकसंख्येनुसार वाढत जातात.
एका जिल्ह्यात सात ते आठ महानगर पालिका असतील तर ही लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आहे, मग त्या शहरांत आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यासाठी सरकारचा पैसा खर्च होतो , असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.





