परप्रांतीयाकडून राज ठाकरेंना शिवीगाळ, मनसे कार्यकर्ते आक्रमक; राजकीय वातावरण तापलं

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात अंधेरी पूर्वेतील महाकाली रोडवरील सुंदरनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परप्रांतीय नागरिक सुजित दुबे याने दारुच्या नशेत राज ठाकरे यांच्या आई-बहिणीवर शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.
काय आहे प्रकरण?
सुजित दुबे हा अंधेरी पूर्वेतील सुंदरनगर परिसरात राहणारा परप्रांतीय नागरिक आहे. मंगळवारी रात्री दारुच्या नशेत त्याने राज ठाकरे यांच्याविरुद्ध अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली.
या घटनेचा व्हिडीओ काही स्थानिकांनी रेकॉर्ड केला, जो काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओत सुजित दुबेने राज ठाकरे यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांवरही आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे दिसून येते. यामुळे मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संतप्त झाले असून, त्यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
व्हायरल व्हिडीओची दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुजित दुबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. मनसे कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
यासोबतच, सुजित दुबे याच्या कथित तीन अनधिकृत धंद्यांवरही कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. पोलिसांनी याप्रकरणी योग्य तपास आणि कारवाईचे आश्वासन दिले आहे.





