‘शिवतीर्थ’वर अचानक हालचालींना वेग ; राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

Raj Thackeray । राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी 25 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडिअम किंवा राजभवनात शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट, अजितदादा गट आणि भाजपचे आमदार मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. या सगळ्या हालचाली सुरु आहेत. असे असताना दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यातील 128 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. मात्र, मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचाही पराभव झाला होता. तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचाही माहीम विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला होता. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत मनसेची बैठक बोलावण्यात आली आहे.
बिनशर्त पाठिंब्याची जाण ठेवणार ? Raj Thackeray ।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. मनसेचे प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे आणि महायुतीमध्ये जवळीक वाढली होती. त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यावर राज ठाकरे यांच्या मनसेला सत्तेत वाटा मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, आता भाजपला एकहाती 132 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे भाजपला सत्तास्थापनेसाठी मनसेसारख्या घटकपक्षांची गरज उरलेली नाही. परंतु, आता राज ठाकरे यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची जाण ठेवून महायुती मनसेला सत्तेचा लाभ देण्यासाठी काही पावले उचलणार का, हे बघावे लागेल. त्यामुळे शिवतीर्थवरील मनसेची सोमवारची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला Raj Thackeray ।
महायुती सरकारच्या सत्तास्थापनेपूर्वी कोणाला किती मंत्रीपदं मिळणार, याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे.





