Raj Kundra: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा आता अभिनयाच्या दुनियेत उतरले आहेत. त्यांची पहिली पंजाबी फिल्म ‘मेहर’ लवकरच प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात राज कुंद्रा करमजीत सिंह ही भूमिका साकारत आहेत. करमजीतचं स्वप्न बॉक्सर होण्याचं असतं, पण अपयशामुळे तो अभिनयाच्या वाटेवर येतो. ट्रेलरमध्ये त्याचा दमदार डायलॉग दाखवण्यात आला आहे, “एक दिवस येईल रंधावा, मला पाहण्यासाठी तुला तिकीट घ्यावं लागेल.” चित्रपटात गीता बसरा करमजीतची पत्नी सिम्मीच्या भूमिकेत दिसते. सुरुवातीला त्यांचं आयुष्य आनंदात दाखवलं जातं, पण एका मोठ्या गोष्टीमुळे त्यांचे नाते तुटू लागतात. इतकंच नाही तर करमजीतच्या वडिलांनाही त्याच्यावर नाराजी व्यक्त करताना दाखवलं आहे. कथेच्या पुढच्या भागात करमजीतचा संघर्ष अधिकच तीव्र होतो. नाती तुटतात, मित्रांपासून तो दुरावतो. शेवटी तो अभिनय सोडून पुन्हा बॉक्सिंगच्या रिंगमध्ये परतण्याचा निर्णय घेतो आणि यावेळी पूर्ण ताकदीने स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. शिल्पा शेट्टीने ट्रेलर शेअर करत लिहिलं… “पंजाबी सिनेमाला एक नवा हिरो मिळाला आहे, पण तो अनेक वर्षांपासून माझा हिरो आहे. राज, तुझं सिनेमांच्या जगात स्वागत आहे.” ‘मेहर’ हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट संघर्ष, प्रेम आणि नातेसंबंधांची अनोखी कहाणी सांगणार आहे.