Satara | एकाच आर्थिक वर्षात दोन वेळा ऊसपीक कर्जाची उचल

सातारा, (प्रतिनिधी) – , ऊस पीक कर्ज उचलीच्या अनुषंगाने एकाच आर्थिक वर्षात वाटपाचे दोन हंगाम येत असतात. यामुळे एकाच आर्थिक वर्षात पहिल्या वाटप हंगामात ऊस पीक कर्जाची उचल करून परतफेड केली व दुसऱ्या वाटप हंगामात नवीन ऊस पीक कर्ज घेतलेले सभासदांना एकाच आर्थिक वर्षाची उचल गृहीत धरून सदर सभासदांना प्रोत्साहनपर रकमेच्या लाभापासून वंचित ठेवलेले होते.
याबाबत आ. मकरंद पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना हो बाब निदर्शनास आणून दिली. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सहकार खात्याकडून योजनेची सर्व माहिती घेऊन एकाच आर्थिक वर्षात दोन वेळा ऊस पीक कर्जाची उचल केलेलेव त्याची नियमित परतफेड केलेले सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना २०१९ मध्ये अंमलात आणली होती. सदर योजने अंतर्गत २.०० लाखापर्यंतची थकीत कर्जांना माफीचा लाभ देण्यात आलेला होता.
त्याचप्रमाणे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना सन २०१७-१८,२०१९-२० व २०१९-२० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून त्याची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे.
या योजनेंतर्गत जिल्हा बँकेशी सलग्न विकास सेवा संस्थाचे जवळपास ३९ हजार सभासदांना २०६ कोटी रुपये थकबाकी रकमेचा लाभ मिळालेला आहे. तर प्रोत्साहनपर योजनेंतर्गत १७१२११ सभासदांना रु.६६८ कोटी प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळालेला आहे.
मात्र, ऊस पीक कर्ज उचलीच्या अनुषंगाने एकाच आर्थिक वर्षात वाटपाचे दोन हंगाम येत असतात. यामुळे एकाच आर्थिक वर्षात पहिल्या वाटप हंगामात ऊस पीक कर्जाची उचल करून परतफेड केली व दुसऱ्या वाटप हंगामात नवीन ऊस पीक कर्ज घेतलेले सभासदांना एकाच आर्थिक वर्षाची उचल गृहीत धरून सदर सभासदांना प्रोत्साहनपर रकमेच्या लाभापासून वंचित ठेवलेले होते.
याबाबत आ. मकरंद पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निदर्शनास आणून दिले की ऊस पीक कर्ज वाटपाचे एकाच आर्थिक वर्षातील दोन वाटप हंगामात कारखान्याकडून ऊस बिलातून कर्जाची परतफेड होऊन सभासद एकाच आर्थिक वर्षात दोन वेळा ऊस पीक कर्जाची उचल करतात व त्याची नियमित परतफेड केलेले सभासद वंचित राहिले आहेत.
दोन वाटप हंगामाचा विचार करून ऊस पीक कर्जाचीनियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळणेबाबत पाठपुरावा केला.
सातारा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील चेअरमन मा. नितीन पाटील, बँकेचे सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी राज्य शासनाकडे याबाबत सततचा पाठपुरावा केलेला असल्याने प्रयत्नाला यश आलेले आहे.
सोसायटीच्या ११ हजार सभासदांना मिळणार लाभ
उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सहकार खात्याकडून योजनेची सर्व माहिती घेऊन एकाच आर्थिक वर्षात दोन वेळा ऊस पीक कर्जाची उचल केलेलेव त्याची नियमित परतफेड केलेले सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकाच आर्थिक वर्षात दोन वाटप हंगामातील ऊस पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या अशा सर्व शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळणार आहे. विकास सेवा संस्थांच्या जवळपास ११००० सभासदांना रक्कम रु. ४० कोटीपर्यंत लाभ मिळणार आहे.





