अग्रलेख : बैठकांचा जोर
देशातील बिहारसह काही राज्यांमध्ये लवकरच होणार्या विधानसभा निवडणुका असोत किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये स्थानिक पातळीवर होणार्या निवडणुका असो, या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये आणि या पक्षांचे प्रतिनिधित्व करणार्या नेत्यांमध्ये बैठकांचा आणि भेटीगाठींचा जोर वाढत चालला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पातळीवर जी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आहे त्या आघाडीची महत्त्वाची बैठक 7 ऑगस्ट रोजी राजधानी नवी दिल्ली येथे होणार आहे. बैठकीला इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना उबाठा नेतेसुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांच्याबरोबर जवळीक वाढण्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये किंवा केंद्रीय पातळीवरील इंडिया आघाडीमध्ये राहील का नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात असतानाच उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे बैठकीचे आणि स्नेहभोजनाचे निमंत्रण स्वीकारले आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये दोन वेळा राजधानीचा दौरा करून आले आहेत. या दौर्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील काही घटक पक्षांच्या नेत्यांचीही भेट घेतली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात राजधानीमध्ये तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकून महत्त्वाच्या नेत्यांबरोबर चर्चा केल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरासुद्धा चर्चेचा ठरला. महाराष्ट्र राज्याचा विचार करता गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये ठाकरे बंधूंचे एकत्रीकरण हाच जास्त चर्चेचा विषय आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये हे बंधू दोन वेळा एकत्र आले.
एकदा ठरवून एका मेळाव्यासाठी एकत्र आले आणि दुसर्यांदा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी राज ठाकरे जाणीवपूर्वक मातोश्रीवर गेले. नंतर शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यामध्ये सुद्धा राज ठाकरे व्यासपीठावर दिसले आणि या व्यासपीठावर शिवसेना उबाठा नेतेही उपस्थित होते. एकूणच या सर्व घडामोडी पाहता सर्वच राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झालेले दिसतात. जरी आगामी कालावधीमध्ये बिहार विधानसभेची निवडणूक सर्वात महत्त्वाची निवडणूक असली तरी स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवरसुद्धा आपल्या पक्षाचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी किंवा ते अधिक वाढवण्यासाठी अशाप्रकारे बैठकांचा जोर वाढत चालला आहे. महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके फुटणार हे निश्चित झाल्याने आतापासूनच प्रत्येकाचे शक्तीप्रदर्शन सुरू झाले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्यापपर्यंत थेटपणे आपण निवडणुकीसाठी एकत्र येणार आहोत अशी घोषणा केलेली नाही. उलट दोनही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीची तयारी करा असाच संदेश दिला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे घटक पक्षही महापालिका किंवा नगरपालिका निवडणुका एकत्रपणे लढवतील असे वाटत नाही. ज्या महापालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये जो पक्ष बलवान आहे त्याला निश्चितच स्वबळाची अपेक्षा असल्याने महाविकास आघाडीचे गणित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जमवले जाईल असे वाटत नाही. दुसरीकडे विरोधकांची ताकद वाढत आहे असे जर दिसले, तर महायुतीचे सर्व घटक पक्ष मात्र महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढतील असेच दिसते.
यासाठीच हा सर्व जोरबैठकांचा विषय सुरू आहे. नवी दिल्लीमध्ये 7 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीची जी महत्त्वाची बैठक होणार आहे त्यामध्येही या आघाडीचे भवितव्य आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे भवितव्य निश्चित होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारला किंवा एकूणच भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला विरोध करण्यासाठी कोणती रणनीती महत्त्वाची ठरू शकेल याचा विचार या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये होऊ शकतो. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये कोणती रणनीती आखायची हा सर्वात जास्त महत्त्वाचा विषय ठरणार आहे. कारण बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल यांना जर यश मिळाले नाही तर तो मोठा धक्का ठरणार असल्याने बिहार विधानसभा निवडणूक हाच एक टॉपचा मुद्दा या बैठकीत असू शकतो.
एकूणच येत्या काही कालावधीमध्ये विविध प्रकारच्या निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण तापणार असल्याने आपापली मैत्री घट्ट करण्याकडे किंवा नवीन मित्र जोडण्याकडेच सर्व राजकीय पक्षांचा कल दिसत आहे. अर्थात नक्की राजकीय चित्र स्पष्ट होण्यासाठी आगामी कालावधीमध्ये अशा प्रकारच्या बैठकांची आणि भेटीगाठींची संख्या आणि तीव्रताही वाढत जाणार आहे, असे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत.





