पुणे – पाणीकपातीची टांगती तलवार असलेल्या पुणेकरांसाठी मान्सूनच्या सरी आनंदवार्ता घेऊन आल्या आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासाखळीच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी असल,े तरी दि.25 ते 27 जूनदरम्यान मोठ्या पावसाची शक्यता आहे.
शनिवारी दिवसभरात खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक 32 मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळपासून शहरात दाखल झालेल्या मान्सूनचे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही आगमन झाले. पावसाचा जोर कमी असून अधून मधून पावसाच्या मोठ्या सरी येत आहेत. मात्र, त्याच वेळी आसपासच्या डोंगररांगांमध्ये पावसाला चांगली सुरूवात झाली असून छोटे पाण्याचे प्रवाह धरणात येण्यास सुरूवात झाली आहे. हे पाणी अगदीच नगण्य असले, तरी तापलेल्या जमिनीत ते मुरण्यास मदत होणार आहे. त्यानंतर पावसाचे पाणी धरणात साठण्यास सुरूवात होईल. शनिवारी दिवसभरात खडकवासला-32, पानशेत-10, वरसगाव-14 तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 10 मिमी पावसाची नोंद झाली.
घाट रस्त्यांबाबत सावधतेचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत पुणे शहरालगतच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शिवाय, ताशी 30 ते 35 कि.मी. वेगाने वारे वाहू शकतात. अशावेळी दृश्यमानता कमी होणार असून, निसरडे रस्ते खड्डे लक्षात घेता घाट रस्त्यांवरून वाहने सावकाश चालवावीत, किंवा त्या मार्गाने जाणे टाळावे. वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.