Weather Update : विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात होणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Weather Update : रायगडमधील कर्जत, खोपोली, खालापूर परिसरात पावसाच्या सरी

Weather Update : राज्यात मुसळधार पावसानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने ब्रेक घेतला आहे. परंतु विश्रांतीनंतर आता पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. साधारण 20 जुलैनंतर संपूर्ण राज्यात मान्सून पुन्हा पूर्ण क्षमतेने सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोच्या परिणामाचा प्रभाव जाणवत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत ताशी ४०-५० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. तसेच पुणे, सातारा, घाटमाथा, सांगली, सोलापूर, धाराशिवमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
जुलैच्या सुरुवातीला मुंबई, कोकण, पुणे आणि घाटमाथा परिसरात चांगला पाऊस झाला. मात्र, उर्वरित महाराष्ट्र अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाअभावी अनेक भागांतील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कमी
मुंबईमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये गुरुवारी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. रायगडमधील कर्जत, खोपोली, खालापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या.
पुणे जिल्ह्यातही आज पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये अद्याप पावसाचा जोर वाढला नसून आज हलक्या सरींची शक्यता आहे.
हेही वाचा:






