पुणे : महापालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदारयाद्यांवर दहा दिवसांत तब्बल 4 हजार 273 हरकती आल्या आहेत. यात सर्वाधिक 2 हजार 366 हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी (रविवारी) आल्या आहेत. या हरकतींमध्ये सर्वाधिक हरकती बोगस मतदारांसह, राहायला एका प्रभागात आणि प्रत्यक्षात नाव दुसऱ्या प्रभागातील यादीत असल्याच्या असून, प्रशासनास पुढील सहा दिवसांत प्रत्यक्ष जागेवर जाऊन या हरकतींनुसार तपासणी करून निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अंतिम याद्या 9 जुलैपर्यंत जाहीर करणार आहे. या कामासाठी महापालिकेकडून स्वतंत्र समन्वयकाचीही नेमणूक केली आहे. 23 जून रोजी या प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. यात अनेक ठिकाणी प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात असण्याच्या तक्रारींचे प्रमाण मोठे होते. यामुळे ही मुदत तीन दिवसांनी वाढवून देण्यात आली होती. या हरकतींमध्ये सर्वाधिक 886 हरकती बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात, तर सर्वांत कमी अवघ्या 42 हरकती औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाकडे आल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयनिहाय हरकती भवानी पेठ – 57 धनकवडी-सहकारनगर – 552 ढोले पाटील रस्ता – 277 हडपसर-मुंढवा – 120 कसबा-विश्रामबाग – 49 कोंढवा-येवलेवाडी – 438 कोथरूड-बावधन – 280 नगर रस्ता-वडगावशेरी – 333 शिवजी रस्ता-घोले रस्ता – 89 सिंहगड रस्ता – 524 वानवडी-रामटेकडी – 143 वारजे-कर्वेनगर – 426 येरवडा-कळस धानोरी – 57