Heavy Rainfall: पावसाने शहराला झोडपले; ठिकठिकाणी साचले पाणी
Heavy Rainfall: नागरिक, वाहनचालकांची गैरसोय

भोसरी – शहराच्या काही भागांमध्ये सोमवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. विशेषत: भोसरीच्या औद्योगिक परिसरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. भोसरी एमआयडीसी चौक परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली.
अनेक ठिकाणी रस्त्यावर पाण्याचे मोठे लोट वाहताना दिसून आले. त्यातच काही ठिकाणी झाडे मोडून पडल्याने वाहतुकीच्या अडचणीत आणखी भर पडली. विश्वेश्वर चौक परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची कोंडी झाली.
पावसाचा जोर वाढताच भोसरी एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर काही वेळातच पाणी साचले. रस्त्याच्या कडेला तसेच काही भागात पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने पाणी रस्त्यावरच राहिले. या पाण्यातून दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना मार्ग काढावा लागत होता. काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याने वाहनांचा वेग कमी झाला. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पावसामुळे एमआयडीसी परिसरातील व्यावसायिक आस्थापने, कामगार आणि नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागला. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालणे कठीण झाले. वाहनांमुळे उडणारे पाणी अंगावर येत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. काही दुकानदार आणि व्यावसायिकांच्या दुकानांच्या प्रवेशद्वाराजवळही पाणी साचल्याने ग्राहकांना ये-जा करताना अडचणी निर्माण झाल्या.
पावसाच्या तडाख्यात परिसरातील काही झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. काही ठिकाणी झाडे रस्त्याच्या बाजूला झुकल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पावसाळ्यात अशा प्रकारे झाडे किंवा मोठ्या फांद्या रस्त्यावर पडल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे धोकादायक झाडे आणि फांद्यांची वेळोवेळी पाहणी करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
विश्वेश्वर चौकातही पाण्याचा मोठा साठा
भोसरीतील विश्वेश्वर चौक परिसरातही अचानक झालेल्या पावसाचा मोठा परिणाम जाणवला. चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागला. पाण्यामुळे रस्त्याची स्थिती स्पष्टपणे दिसत नसल्याने दुचाकीस्वारांना विशेष काळजी घ्यावी लागत होती.
पाण्यातून वेगाने वाहने गेल्यामुळे आजूबाजूच्या वाहनांवर आणि पादचाऱ्यांवर पाणी उडत होते. पाणी साचण्याच्या समस्येमुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला. एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार, मालवाहतूक करणारी वाहने, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे मुसळधार पावसानंतर रस्त्यावर पाणी साचल्यास त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागला.
तात्पुरत्या उपायांपेक्षा कायमस्वरूपी उपायांची मागणी
दरवर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक विस्कळीत होत असल्याने केवळ पाणी उपसण्याऐवजी पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. रस्त्यावरील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह, ड्रेनेज व्यवस्था, नाले आणि चेंबर यांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
महापालिका प्रशासनाने भोसरी एमआयडीसी चौक, विश्वेश्वर चौक आणि परिसरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची तातडीने पाहणी करून पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Accident: लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या तरुणांच्या कारची ट्रकला धडक; एकाचा मृत्यू




