Accident: लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या तरुणांच्या कारची ट्रकला धडक; एकाचा मृत्यू
Accident : कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली

पिंपरी – लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन मुंबईहून पुण्याकडे परतणाऱ्या तरुणांच्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. २० सप्टेंबर) रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुंबई-सातारा महामार्गावरील वाकड ब्रिज जवळ घडला.
ट्रक चालक हसन बाबालाल मुलाणी (वय ५८, रा. स्कॉटर कॉलनी, मालाड वेस्ट, मुंबई) याच्या विरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर येथील अपघातात जखमी झालेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र पियुष रसाळ, गौतम ओव्हाळ आणि मुकेश साळुंके हे सर्वजण कारने लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन हडपसरकडे परतत होते.
दरम्यान, वाकड ब्रिजजवळ आरोपीने आपल्या ताब्यातील ट्रक महामार्गाच्या दुभाजकाला लागून कोणताही टेल लॅम्प, इंडिकेटर अथवा सुरक्षेचे बॅरिकेड्स न लावता धोकादायकरीत्या उभा केला होता. फिर्यादी यांची कार या उभ्या ट्रकला पाठीमागून धडकली. या धडकेत ट्रकचे मागील अँगल गळ्यात घुसल्याने पियुष संजय रसाळ (वय २१, रा. पिंगळे वस्ती, मुंढवा) याचा मृत्यू झाला, तर मुकेश सुनील साळुंके (वय २५) हा जखमी झाला. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
Political News : कॉंग्रेसकडून अपयश लपवण्यासाठी नवे बहाणे; एसआयआरवरील टीकेवरून भाजपचा पलटवार




