Maharashtra Rain : शनिवारी पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Rain: अपेक्षेप्रमाणे पाऊस पडत नसल्यामुळे शेतीतील पीकांना मोठा फटका बसत आहेत. चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र काही ठिकाणीच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आता हवामान विभागाने उद्या शुक्रवारपासून राज्यात पुन्हा पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे. तर शनिवारी पावसाचा जोर वाढणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
उद्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर, नाशिक आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शनिवारी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विर्भातील यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच खानदेश जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.



