भामा खोऱ्यात पाऊस ओसरला; धरणातून विसर्ग घटवला

“भामा आसखेड’मधून 2 हजार 741 क्‍युसेकने विसर्ग सुरू असल्याने सतर्कतेचा इशारा रविवारीही कायम

शिंदे वासुली – एक महिन्याच्या विश्रांतीनंतर भामा खोऱ्यात पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू झाली आहे. मागच्या पावसातच भामा आसखेड धरण तुडूंब भरले होते. पाऊस थांबल्याने धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद केला होता; परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने धरण प्रशासनाने चारही दरवाजातून शनिवारी (दि. 14) धरणातून 11 हजार 527 क्‍युसेकने विसर्ग सुरू केल्याने धरणाखालील भामा नदीवरील धामणेचा पूल पुन्हा पाण्याखाली गेला होता. मात्र, रविवारी पावसाचा जोर ओसरल्याने रविवारी (दि. 15) विसर्ग हळूहळू कमी करत तो 2 हजार 741 क्‍युसेकवर आणण्यात आला असल्याने पाणी पुलाला लागून आहे. दरम्यान, शनिवारी नागरिकांना दिलेला सतर्कतेचा इशारा अद्यापही कायम ठेवला आहे.

कित्येक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची शेतातील खरिपाची पिके पुन्हा उभारी घेऊ लागली होती; परंतु जिरायती भागील पिकांना थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने पाण्याची गरज असते. पाऊस बरेच दिवस गायब झाल्याने पिके कोमेजून जाऊ लागली होती. त्यामुळे भांबोली येथील दत्तात्रय राऊत या शेतकऱ्याने बटाटा, भुईमूग सारखी हातातोंडाशी आलेली पिके हातची जाण्याच्या भीतीने टॅंकरने पाणी दिल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत पुन्हा वरुणराजाची कृपा बळीराजावर झाल्याने शेतकरी समाधानी आहेत. परंतु, पावसाचा लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना निश्‍चितच बसणार आहे.

अजूनही काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होणे बाकी आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. शेती करणे भरवशाचा व्यवसाय व एक प्रकारची जुगारच असल्याचा प्रत्येय शेतकऱ्यांना आलेला आहे. दरम्यान, पर्जन्यमानानूसार धरणातील विसर्ग कमी-जास्त केला जाणार असल्याचे उपअभियंता भरत बेंद्रे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.