Purandar : वाल्हे परिसरात पावसाने बाजरीला नवसंजीवनी
Purandar : ऐन फुलोऱ्यात आलेल्या बाजरीच्या कणसांना या पावसाचा मोठा फायदा होत असल्याने वाल्हे परिसरातील दौंडज, पिंगोरी, कवडेवाडी, आडाचीवाडी, हनुमानवस्ती, वरचामळा, पिसुर्टी, जेऊर, मांडकी, राख आणि नावळी येथील शेतकरी वर्ग सुखावला आहे.

वाल्हे : पुरंदर तालुक्यातील जिरायती भागात ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडल्यामुळे जमिनीतील ओल कमी होऊन कोमजण्याच्या मार्गावर असलेल्या बाजरीच्या पिकाला मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने मोठा दिलासा दिला आहे. ऐन फुलोऱ्यात आलेल्या बाजरीच्या कणसांना या पावसाचा मोठा फायदा होत असल्याने वाल्हे परिसरातील दौंडज, पिंगोरी, कवडेवाडी, आडाचीवाडी, हनुमानवस्ती, वरचामळा, पिसुर्टी, जेऊर, मांडकी, राख आणि नावळी येथील शेतकरी वर्ग सुखावला आहे.
या वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती. तरीही शेतकऱ्यांनी बाजरीसह भुईमूग, सूर्यफूल, तूर, मूग आणि उडीद या पिकांची पेरणी केली होती. मध्यंतरीच्या काळात कडक उन्हामुळे पिके सुकू लागली होती; मात्र आता पडत असलेल्या संततधार पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, यंदा बाजरीचा समाधानकारक उतारा मिळेल असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
पूर्व भागात पाणीटंचाई
वाल्हे परिसरातील पूर्व भागात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा असून पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. कामठवाडी, सुकलवाडी, अंबाजीचीवाडी व मुकदमवाडी या भागांत मान्सूनपूर्व व मान्सूनचा पाऊस कमी झाल्यामुळे यंदा खरिपाचे उत्पन्न घटण्याची भीती आहे. तालुक्यातील बहुतांश भागांत नद्या-नाले भरून वाहले असले, तरी पूर्व भाग अद्याप तहानलेलाच आहे. त्यामुळे वाल्हे परिसरातील पूर्व भागातील शेतकरी चिंतेत, तर पश्चिम भागातील शेतकरी काहीसे समाधानी असे विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे.





