Railway project conflict | तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वेमार्गाला कुरुळीतून तीव्र विरोध ; आंदोलनासाठी कृती समिती स्थापन

प्रभात वृत्तसेवा
चिंबळी – कुरुळी (ता. खेड) येथील स्थानिक भूमिपुत्र शेतकर्याचा तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वेमार्गाला कुरुळी पंचक्रोशीतील नागरिक आणि शेतकर्यांनी तीव्र विरोध दर्शविला. या पार्श्वभूमीवर विरोध सभेचे आयोजन कुरुळी येथे करण्यात आले होते.यावेळी खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून तळेगाव-उरुळी कांचन रेल्वे मार्ग कुरुळी, मोई, निघोजे, चिंबळी, केळगाव आदी गावांच्या हद्दीतून जाणार असल्याने पंचक्रोशीतील नागरिक व शेतकर्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सरकारने विश्वासात न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. परिसरातील विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामसभा घेऊन रेल्वे लोहमार्ग विरोधाचा ठराव मंजूर करून केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित विभागांना देण्यात येणार आहे. पुढील आंदोलनासाठी कृती समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.गुंठेवारी पद्धतीने जागा घेऊन अनेक कामगारांनी राहण्यासाठी घरे बांधली आहेत.
या घरांवर लोहमार्ग जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त झाला. या प्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते, वसंत भासे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, माजी सभापती विलास कातोरे तसेच परिसरातील सुमारे तीनशे शेतकरी व ग्रामस्थ, रेल्वे लोहमार्ग प्रकल्प बाधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वे लोहमार्गाला कुरुळी पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी आणि भूमिपुत्र यांचा तीव्र विरोध आहे. आम्ही देखील या विरोधात सहभागी होणार आहोत. हा प्रकल्प केंद्र सरकारचा असल्याने केंद्रातील मंत्री व राज्यातील मंत्र्यांच्या समोर प्रकल्प बाधित शेतकर्यांचे शिष्टमंडळ घेऊन निवेदन सादर करून चर्चा करू.”
-दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार, खेड आळंदी
“शासन स्तरावर चालू असलेल्या तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या डीपीआरला पुणे महानगर नियोजन समितीची अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे हा डीपीआर बेकायदेशीर ठरत आहे.”
-वसंत भसे, सदस्य – पीएमआरडीए





