Raigad News : रायगडमध्ये दोन भावांसह तिघांचा बुडुन मृत्यू

रायगड – रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात नागोठणेजवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. बेणसे गावाजवळील सिद्धार्थ नगर परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्खा भावांसह तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. अश्फाक अन्सारी (16), मिझान जाकीर अत्तर (14) आणि जोहेब जाकीर अत्तर (17) अशी मयत मुलांची नावे आहेत.
तिन्ही मुले एकाच गल्लीत राहत होती. यापैकी जोहेब आणि मिझान हे सख्खे भाऊ होते. तिघेही शुक्रवारी डोहात पोहायला गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही पाण्यातून बाहेर काढत नागोठणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर तिघांनाही वडखळ येथील जेएसडब्लू कंपनीच्या संजीवनी रुग्णालयातात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बेणसे गावावर शोककळा पसरली आहे.





