Devendra Fadnavis : “राहुल यांचा महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ढोंगी” – देवेंद्र फडणवीस
दररोज भाषणे ठोकणे आणि टीव्हीच्या माध्यमातून चर्चेत राहणे, एवढेच त्यांचे काम आहे. ते यापलीकडे काहीच करत नाहीत.

Devendra Fadnavis – संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करूनही महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणे, ही लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची राजकीय भूमिका ढोंगी आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. राहूल यांनी पुण्यात विद्यार्थिनींशी साधलेल्या संवादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे भाष्य केले.
नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस हा केवळ दिखावा करणारे आणि बढाया मारणारे लोक असलेला दिशाहीन पक्ष आहे, जे केवळ टीव्हीवर चर्चेत राहण्यासाठी भाषणे करतात, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी शनिवारी पुण्यात छात्रों की गूंज या संवाद कार्यक्रमात विद्यार्थिनींशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मनुस्मृतीवादी मानसिकतेवर टीका केली आणि महिलांना पितृसत्ताक पद्धती मोडून काढण्याचे आवाहन केले. तसेच, जंतरमंतर येथील आंदोलनादरम्यान मुलींनी अपशब्द वापरल्याचे ऐकून धक्का बसल्याचे विधान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी निशाणा साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, राहूल यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या प्रश्नाचे आधी उत्तर द्यावे. हा प्रश्न महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यास ते का नकार देतात, याबद्दलचा आहे. देशाच्या घटनात्मक प्रक्रियेत संसद ही सर्वोच्च संस्था आहे आणि तिथे ३३ टक्के खासदार महिला असाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत.
पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचे आणि ज्या विधेयकामुळे त्यांना खऱ्या अर्थाने अधिकार मिळतील, त्यालाच विरोध करायचा; ही राहुल गांधींची ढोंगी भूमिका आहे. मंचावरून गांधींनी महिला सक्षमीकरणाबद्दल भाषण केले असले, तरी महिलांना अधिकार देणाऱ्या सर्वात क्रांतिकारी पाऊल असलेल्या महिला आरक्षण विधेयकाला त्यांनी विरोध केला आहे आणि त्याच्या विरोधात मतदानही केले आहे.
त्यांना महिलांना अधिकार द्यायचे नाहीत. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत तफावत आहे, असे मला वाटते. दररोज भाषणे ठोकणे आणि टीव्हीच्या माध्यमातून चर्चेत राहणे, एवढेच त्यांचे काम आहे. ते यापलीकडे काहीच करत नाहीत. त्यांचा जमिनीवरील वास्तवाशी संपर्क तुटला आहे. हा पक्ष आता केवळ निवेदने जारी करण्यापुरताच मर्यादित राहिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.





