Lok Sabha Election 2024 : राहुल यांना १४ दिवसांत १ जागा सोडणे अनिवार्य; कोणती जागा सोडणार, वाचा….

Rahul Gandhi | Lok Sabha Election 2024 – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी लोकसभेच्या २ जागांवरून विजय मिळवला. मात्र, राज्यघटना आणि कायद्यातील तरतुदींतर्गत त्यांना निकाल जाहीर झाल्यापासून १४ दिवसांत १ जागा सोडणे अनिवार्य आहे.
केरळमधील वायनाड आणि उत्तरप्रदेशातील रायबरेली या मतदारसंघांमधून राहुल यांनी निवडणूक लढवली. त्या दोन्ही जागी ते विजयी झाले. आता ते कुठली जागा सोडणार आणि कुठल्या जागेचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणार याविषयी उत्सुकता आहे.
त्याविषयी राहुल किंवा कॉंग्रेसकडून अद्याप सूतोवाच करण्यात आलेले नाही. त्यामुळे तर्क-वितर्क सुरू आहेत. मागील वेळीही राहुल यांनी २ जागांवरून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना उत्तरप्रदेशच्या अमेठीतून पराभव पत्करावा लागला.
मात्र, वायनाडमधून ते विजयी झाले. यावेळी दोन्ही मतदारसंघांमध्ये त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यामुळे कुठली जागा सोडावी याबाबत त्यांच्यापुढे संभ्रम निर्माण झाल्याचे समजते.
अर्थात, रायबरेली हा गांधी परिवाराचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे ती जागा कायम ठेवण्याचा निर्णय राहुल घेतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वांधिक जागा आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे राजकीय हित विचारात घेऊन ते रायबरेलीलाच पसंती देण्याची शक्यता अधिक आहे.





